मराठी भाषा संस्कृति ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा 2019 व 2020 चा पुरस्कार सोहळा देवास येथे संपन्न

शनिवारी चार डिसेंबर रोजी संध्याकाळी देवास येथे बृहन महाराष्ट्र मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संस्कृती व ज्ञान स्पर्धा आणि निबंध स्पर्धा 2019 व 2020 करिताचा पुरस्कार वितरण सोहळा जनरल मोटर्स अमेरिका येथील श्री निखील आपटे यांच्या मुख्यआतिथ्यात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी श्री आपटे आणि मंडळ अध्यक्ष श्री मिलिंद महाजन यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या चित्रावर माल्यार्पण आणि दीप प्रज्ज्वलन करून झाले. अतिथी परिचय सौ . देवश्री टाकळकर यांनी दिला . सौ. उज्ज्वला कर्पे यांनी मराठी भाषा संस्कृति व ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धेमागचा उद्देश्य विशद करून सांगितला . या नंतर परीक्षा प्रमुख श्री सुभाष वाघमारे यांच्या संचालन अंतर्गत विविध गटातील जेते, केंद्रप्रमुख, विद्यार्थी मार्गदर्शक इत्यादिंना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले . या वेळेस परिक्षार्थींच्या वतीनं कुमार रचित बाकरे (देवास) आणि कुमारी साधना पाटील (बेळगांव) यांनी सुद्धा त्यांना आलेल्या सकारात्मक अनुभवां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री आपटे यांनी संत ज्ञानेश्वर, छत्रपति शिवाजी महाराज ते पु.ल.देशपांडे यांच्या पर्यंतच्या विभूतिंद्वारे मराठी भाषेला लाभलेला वारसा सांगितला . त्यांनी भाषेला एक इंजन आणि मंडळ, परीक्षार्थी , परीक्षक इत्यादींना चाके आणि हे सर्व मिळून तैयार होते ती मराठी प्रोत्साहनाची गाडी , अशी उपमा मंडळाच्या या उपक्रमास दिली . मंडळाचे अध्यक्ष यांनी बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिकांमध्ये मराठी बद्दल असलेल्या आपुलकी बद्दल समाधान व्यक्त केले आणि अश्या प्रकल्पास देशा बाहेरील इतर मंडळांपर्यंत पोहोचवायचा मानस व्यक्त केला . शेवटी श्री दीपक कर्पे यांनी आभार मानले आणि सोहळ्याच्या पूर्वार्धाची सांगता झाली . कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतांजली सिंगिंग ग्रुप देवास यांनी हिन्दी मराठीतील सुरेल गीतांची प्रस्तुती दिली आणि कु. मनस्वी किरकिरे (शाजापुर), कु. अंतरा आठवले (उज्जैन), कु. मृणालिनी सरवटे (देवास) यांनी सुंदर कत्थक नृत्य प्रस्तुति दिली जी उपस्थितांची दाद मिळवून गेली .